Breaking News

रंगनाथ पठारे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

Vinda Karandikar Lifetime Achievement Award to Ranganath Pathare - Announcement by Marathi Language Minister Subhash Desai

        मुंबई -: मराठी भाषा विभागाचे विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक हे चार पुरस्कार अनुक्रमे रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, डॉ.सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

        मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा गौरव दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात येतील, असेही श्री.देसाई यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.

पुरस्कार विजेते

        यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रु.5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. श्री.पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पद भूषविलेले आहे.

        यावर्षीचा श्री. पु. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरुप रु.3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी ‘शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.

“मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” यावर्षी डॉ. सुधीर रसाळ, औरंगाबाद यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरुप रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. डॉ.रसाळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 35 वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली 60 वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करीत आहेत.

        कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी रु.2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

        संजय भगत यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने तयार केलेल्या परिभाषा कोश सामान्य जनतेपर्यंत प्रथम संगणक माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले. तसेच आधुनिक तंत्रानुसार शासकीय कोश सर्व लोकांना पाहता यावे यासाठी स्वखर्चाने आधुनिकीकरण करून घेतले. मराठीचे अभ्यासक या संकेतस्थळाचा वापर करतात. तर मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांच्यामार्फत विविध प्रकाशने प्रकाशित होतात. पंचधारा नियतकालिकांचे प्रकाशन हा उपक्रम दीर्घकाळ चालू आहे. तसेच चर्चासत्रांचेही आयोजन केले जाते.

        हे पुरस्कार 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

No comments