Breaking News

भिडेवाडा वास्तू संदर्भात त्वरित समिती स्थापन करण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal's directive to set up a committee immediately regarding Bhidewada Vastu

        मुंबई दि. 11 : पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

        महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

        अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, भिडेवाडा ही वास्तू खासगी मालकीची आहे. तसेच या वास्तुत राहणाऱ्या भाडेकरुंनी दहा वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा. भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय करता येईल तसेच याप्रकरणात न्यायालयाच्या बाहेर संमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही समितीमार्फत तपासण्यात यावी, असे निर्देश श्री.भुजबळ यांनी दिले.

        सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलावण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील बैठकीसाठी संबंधित विभागांबरोबरच ॲडव्होकेट जनरल यांनाही बोलविण्यात येईल. फुले दाम्पत्याने भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.

No comments