Breaking News

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे खराब झालेल्या कापसाच्या नुकसानीसंदर्भात चौकशी करा – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

Inquire into the  damage to cotton damaged by unseasonal rains and storms -  Minister Balasaheb Patil

        मुंबई - : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगाम 2019-20 मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 20 पर्यत कापूस खरेदी करण्यात आली. अनजिंन कॉटन, डॅमेज गाठी, सरकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या तक्रारी प्राप्त  झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी नियुक्त करुन प्रत्येक सेंटरची चौकशी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

    मंत्रालयात सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कापूस नुकसान भरपाईसंदर्भात बैठक झाली.

        श्री.पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोरोना काळातसुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करण्यात आली. लॉकडाऊन कालावधीमध्येसुद्धा नियमांचे पालन करुन वाहतूक प्रक्रिया सुरू ठेवून  ऑगस्ट, सप्टेंबर 2020 पर्यत कापूस खरेदी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती. या काळात अवकाळी पाऊस, निसर्ग वादळ यामुळे कापसाचे नुकसान झाले आहे अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत चौकशी अधिकारी नियुक्त करुन प्रत्येक जिनिंगनुसार तपासणी करावी आणि वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

        यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एम.डी.उन्हाळे, कृषि पणन संचालक सतीश सोनी, पणन विभागाचे उपसचिव श्री.वळवी आदी उपस्थित होते.

No comments