Breaking News

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

Fund sanctioned Rs 28.48 crore for Shri Kshetra Nira Nrusinhapur Development - Tourism Minister Aditya Thackeray

मुंबई, दि. 6 : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर साठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधांची उभारणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील पर्यटनाच्या विविध घटकांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला असून यामध्ये अध्यात्मिक पर्यटन तथा तिर्थक्षेत्र पर्यटनासही चालना देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी तिर्थक्षेत्र स्थळांना पर्यटनदृष्ट्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. श्री क्षेत्र निरा नृसिंहपूरच्या विकासासाठी 260.86 कोटी रुपयांचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत आतापर्यंत तरतुदीनुसार निधी वितरीत करण्यात आला असून आता 28.48 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षामध्येही या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी उर्वरित निधीची तरतूद करण्यात येईल. श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्राचा सर्वांगिण विकास करुन पर्यटन विभागामार्फत तिथे भाविकांसाठी चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर हे राज्यातील एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र आहे. येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. भिमा आणि निरा नदीच्या संगमावर वसलेल्या या तिर्थक्षेत्राचे पर्यटनदृष्ट्याही महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करुन, त्याचबरोबर भाविक आणि पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन या तिर्थक्षेत्रास अध्यात्मिक पर्यटनस्थळांच्या नकाशावर ठळकपणे आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

No comments