फलटण तालुक्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी ८१.७४ % मतदान
फलटण -: फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अंतीम टप्यात सुरु असून ६ ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या आहेत. उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामध्ये ५८८२८ पुरुष, ५३४०२ स्त्रीया अशा एकूण १ लाख १२ हजार २३० म्हणजे ८१.७४ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी कळविले आहे.
फलटण तालुक्यात ७४ ग्रामपंचायती मधील ५७४ जागांसाठी १२५५ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. तालुक्यातील २६१ मतदान केंद्रावर ६६१४० स्त्रीया, ७११६१ पुरुष अशा एकूण १ लाख ३७ हजार ३०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था चोख ठेवली होती, तर पारदर्शक व सुरक्षीत वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्याचबरोबर गावागावात नियुक्त असलेले पोलीस पाटील यांनी शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.
![]() |
मतदानाचा हक्क बजावताना पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे, गोविंदचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे |
हिंगणगाव, नांदल व खामगाव येथील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सदर तीनही ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलून तातडीने मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याने मतदान प्रक्रियेत खंड पडला नाही. सर्वत्र मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार पडली. पहिल्या २ तासात १३.४७ %, त्यानंतर दुपारी १.३० वाजता ३३.७० %, दुपारी ३.३० वाजता ५४.४९ % आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ७०.९५ % मतदान पार पडले होते, अनेक गावात मतदारांनी रांगा लावून मतदान केले, निंभोरे येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रांगेत उभा राहुन मतदानाचा हक्क बजावला. साखरवाडी, कोळकी, निंबळक, हिंगणगाव, राजाळे वगैरे काही गावात चुरशीने परंतू शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी सोनगाव येथे, गोविंदचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंद) उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी साखरवाडी येथे, राज ग्रुपचे राम निंबाळकर यांनी निंबळक येथे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार यांनी राजुरी येथे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले यांनी होळ येथे तर साखरवाडीचे विद्यमान सरपंच विक्रम भोसले यांनी साखरवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्यासह संपूर्ण प्रशासन यंत्रणेने ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल यासाठी केलेले नियोजनानुसार सर्व प्रक्रिया पार पडली असून आता सोमवार दि. १८ रोजी शासकीय धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
No comments