कंत्राटदाराकडून आदेशाचे उल्लंघन : उपनगराध्यक्षांनी दिले कारवाईचे निर्देश
फलटण (ॲड. रोहित अहिवळे) - मोबाईल कंपनीची केबल टाकण्याच्या कामासाठी खड्डा खोदताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरीकांची दोन दिवसापासून पाण्याची बोंब झाली असून, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्याकडे तक्रार केली असता, संबंधित कंत्राटदाराला सदरचे काम स्थगित ठेवण्याचे आदेश असतानाही, कंत्राटदार आदेशाचे उल्लंघन करून, रात्रीचे काम सुरू ठेवत असल्याचे पुढे आले असता उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीची पाहणी करून कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच पाईपलाईन चे काम त्वरित करण्याच्या सूचना दिल्या.
फलटण शहरात सध्या मोबाईल कंपनीचे चारी खोदून केबल अंथरण्याचे काम चालू आहे. हे काम करणारा कंत्राटदार सर्व नियम धाब्यावर बसवून काम करत आहे. सदरचे काम रात्रीचे चालू आहे. परंतु रात्रीच्या वेळी गडबडीत केलेल्या कामामुळे कित्येक जनांच्या पिण्याचे पाईप लाईन कट झाल्या आहेत व व त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. केबल अंथरण्याचे काम चालू असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरच्या बाजूस दोन इंची पाईप लाईन, तसेच इतर नागरिकांच्या वैयक्तिक पाण्याची कनेक्शन तुटलेली आहेत, त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पाण्याची बोंब झाली होती.
सोमवारी नागरिकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांची भेट घेऊन, सदरचा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर उपनगराध्यक्ष यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सदर कामाची माहिती घेतली असता, त्या कंत्राटदाराने यापूर्वीही डीएड कॉलेज चौक येथे चारी खोदताना,असेच नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडली होती आणि त्यामुळे त्यास काम स्थगित करण्याचे आदेश दिल्याचे समोर आले. अशी परिस्थिती समोर आल्यानंतर उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत संबंधित कंत्राटदाराला बोलवून घेऊन, योग्य ती चौकशी करून, कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच आलेल्या नागरिकांच्या पिण्याचे पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.
No comments