Breaking News

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

The need for more vigilance against the background of the new corona virus - Deputy Chief Minister Ajit Pawar

        पुणे, दि. 26 : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व इतर आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासकीय पातळीवरून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

        ‘कोविड-19 व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ.डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, अनावश्यक गर्दी टाळण्यासोबतच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्वतयारीचाही श्री.पवार यांनी आढावा घेतला.

        डॉ.सुभाष साळुंके म्हणाले, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील काही दिवस अत्यंत दक्षता घ्यावी लागणार आहे.

        जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन, कोविडनंतरचे समुपदेशन, आठवडानिहाय नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील याबाबत माहिती देत पॉझिटिव्हीटी दर व मृत्यूदर कमी होत असल्याचे सांगतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.

        पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.

        पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

No comments