मराठा आरक्षण व लाईट बिल प्रकरणी राज्यपालांनी लक्ष्य घालावे - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
![]() |
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी चर्चा करताना खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मराठा आरक्षण स्थगिती मुळे आज मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठे नुकसान होत आहे, नोकऱ्यांचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी परखड भूमिका, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मांडली आणि मराठा आरक्षण प्रकरणी राज्यपाल महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणी केली.
भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
मराठा आरक्षणाच्या आड कोणी येऊ नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति मोर्चे काढणाऱ्यांनी मराठा समाज हा इतर समाजाचे आरक्षण कमी करून आरक्षण मागत नाही. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याउलट समाजातील सर्व नेतेमंडळींनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे. तरी या बाबत राज्यपाल महोद यांनी लक्ष घालावे अशी मागणी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना व सामान्यांना लाईट बिलाच्या बाबत दिलेला शब्द पाळावा. लोकांना भरमसाठ लाईट बिल आलेली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे. लोकांना लाईट बिल भरणे सुद्धा शक्य नाही. तरी या बाबत राज्य शासनाला आपण सूचना देऊन सरसकट लाईट बिल माफी द्यावी अशीही मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. यावेळी राज्यपाल महोदयांनी वरील दोन्ही विषयांमध्ये लक्ष घातले जाईल असे आश्वासन यावेळी दिले आहे.
No comments