Breaking News

कोल्हापुरी चपलांचा ब्रँड विकसित करून मोठ्या स्टोअरमध्ये विक्री करण्यासाठी अहवाल तयार करण्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांचे निर्देश

Minister of State Dr. Vishwajit Kadam instructs to develop Kolhapuri Chappals brand and prepare report for sale in big stores

        मुंबई -: कोल्हापुरी चप्पला ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. या व्यवसायाच्या वाढीसाठी या चप्पलांचा ब्रँड विकसित करावा. मोठ्या स्टोअरमधून या चप्पलाच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे सहकार्य घेण्यासंदर्भात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.

        संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासंदर्भात राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव सं.गी. पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण जाहीर उपस्थित होते.

        डॉ. कदम म्हणाले की, कोल्हापुरी चप्पला ह्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. या व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी तसेच या चप्पलांची विक्री नावाजलेल्या दुकानांमधून व्हावी, यासाठी विविध कंपन्यांबरोबर भागीदारी करता येईल. यासाठी महामंडळाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे.

        महामंडळाचे कामकाज, आतापर्यंत दिलेली कर्जे, कर्जांची वसुली, उत्पादने, तरुणांना देण्यात येणारे प्रशिक्षण आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून महामंडळाच्या ऊर्जितावस्थेसाठी विविध उपक्रम घेण्यात येतील. महामंडळाच्या योजनांचा लाभ चर्मकार समाजाला व्हावा, यासाठी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या विविध मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.

        यावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथ मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विठ्ठल नांगरे, दामाजी रोटे, सरचिटणीस जीवन पोवार, दीपक खांडेकर, एम.के. चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments