विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह दीर व जाऊ यांच्यावर गुन्हा
फलटण दि. 3 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - माहेरहून जमिनीतील हिस्सा व सोन्याच्या अंगठी आणण्याच्या कारणावरून, सांगवी ता. फलटण येथील विवाहितेस वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन, तिचे जगणे मुश्किल करून, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह दीर व जाऊ यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत सोनाली महेश काकडे वय 28 वर्षे राहणार सांगवी ता. फलटण या विवाहितेने सांगवी येथे राहत्या घरात दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेला पती महेश आनंदा काकडे, दीर गणेश आनंदा काकडे, जाऊ अमृता गणेश काकडे सर्व राहणार सांगवी ता. फलटण जि. सातारा हे शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पती महेश आनंद काकडे याने मयत सोनाली हिस वडिलांना जमिनीतील हिस्सा व सोन्याच्या अंगठी करायला सांग असे म्हणून तर दीर गणेश आनंदा काकडे व जाऊ अमृता गणेश काकडे या दोघांनी, तू आमच्या घरात राहायचे नाही, घरातून निघून जा, असे म्हणून सोनाली हिचा सतत शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी करून, तिला जगणे मुश्किल करून, सोनाली हीस घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद मयत सोनाली हिचा भाऊ मयूर बाबासो आढाव वय 26 वर्षे रा. गुणवरे ता. फलटण जि.सातारा यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन.जाधव करीत आहेत
No comments