Breaking News

अभिजीत बिचुकले यांनी नाव नोंदणी अर्ज केलाच नव्हता ; तक्रारीबाबत सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडून खुलासा

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत दोन्ही जागा लढवणाऱ्या अभिजित बिचुकले यांचे नाव मतदारयादीत नसल्याने उमेदवार असुनही त्यांना आज मतदान करता आले नाही. याचे खापर प्रशासनावर फोडून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. परंतु बिचुकले यांनी मतदार नोंदणीसाठी अर्जच दाखल केला नसल्याचा खुलासा सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 
        सातारा दि.1  : शिक्षक व पदवीधर निवडणुक-2020 साठी आज 1 डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदानासाठी मतदार यादीमध्ये माझे नाव नसलेबाबतची बाईट अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी विविध वृत्त वाहिन्यांवर दिली असून सदर  न्युज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत पडताळणी केली असता खालीलबाबी प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.
        अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले हे शिक्षक व पदवीधर या निवडणुकरीता उमेदवार असून पदवीधर मतदार संघाच्या मतपत्रिकेमध्ये अनुक्रमांक 14 वर त्यांचे नाव असून शिक्षक मतदार संघाच्या मतपत्रिकेमध्ये अनुक्रमांक 5 वर त्याचे नाव नमुद आहे.
        अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी सातारा विविध वृत्त वाहिन्यांवर दिलेल्या बाईटच्या अनुषंगाने तहसीलदार सातारा यांच्यामार्फत पडताळणी केली असता कार्यालयातील शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीचे प्राप्त मंजूर/नामंजूर नमुना नं.18 व नमुना नं.19 अर्जाची पडताळणी अंती अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले यांनी या कार्यालयास शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी करीता अर्ज दाखल केलेला नाही. तसेच मुलाखतीमध्ये त्यांनी अर्ज सादर केलेला पुरावा त्यांच्याकडे असलेबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.
        शिक्षक व पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी 23 नाव्हेंबर 2019 रोजी व अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तसेच पुरवणी क्र.1 पुरवणी क्र.2 व पुरवणी क्र.3 मुळ यादीसह मतदार यादी निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या प्रसिद्धी कार्यक्रमानुसार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. मतदार याद्यांची प्रसिद्धी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रसिद्धी करण्यात आलेली असून मतदार यादीवर हरकत घेण्याचा कालावधीत अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी कोणत्याही प्रकारची हरकत दाखल केलेली नसल्याचे दिसून येत आहे. यादी ही कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावरही सर्व मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही, परंतु उमेदवाराचे नाव राज्य विधानसभेच्या विधानसभेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.

No comments