निवृत्त कामगारांनी केली उपोषण स्थळावर पहिली आंघोळ ; पैशाची भ्रांत असताना हक्काचे पैसे मिळत नाहीत - ॲड. निकम
![]() |
उपोषण स्थळावर दिवाळीची पहिली आंघोळ करताना आंदोलक |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - साखळी उपोषणास सहा दिवस झाले, तरी श्रीराम कारखान्याचे प्रशासन, नेतेमंडळी निवृत्त कामगारांच्या कडे लक्ष देत नाही, याच्या निषेधार्थ आज आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर अभ्यंगस्नान केले आहे. आमचं कारखाना प्रशासनास आवाहन आहे की, गोरगरीब सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करू नका, कोणाच्या घरी लग्नकार्य तर कोणाच्या घरी आजारपण, अशी विविध कारणे आहेत, निवृत्त कामगारांना पैशाची गरज आहे, पैशाची भ्रांत असताना त्यांना हक्काचे पैसे मिळत नाहीत, म्हणून आज सेवानिवृत्त कामगारावर रस्त्यावर आंघोळ करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम व थकीत पगार आणि रजेचा कामगारांना पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी दिला.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकीत पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा याकरता ऐन दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली १५० कामगारांना घेऊन साखळी उपोषण चालू असून शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी निवृत्त कामगारांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी उपोषणस्थळी, कारखाना प्रशासनाचा निषेध करून अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ) केले. यावेळी ॲड. नरसिंह निकम बोलत होते.
निवृत्त कामगारांची ग्रॅच्युइटीची रक्कम देताना, कारखान्याकडे पैसे नसल्याचे कारण पुढे केले जातेय, परंतु कारखाना व डीस्टीलरी ही भाडेतत्वावर चालविण्यास दिलेले असून, वर्षाला सुमारे साडेपाच कोटी रुपये भाडेपट्टा येत असताना देखील, कामगारांचे ग्रॅच्युइटी रक्कम दिली जात नाही, कारखाना प्रशासन व नेतेमंडळींची पैसे देण्याची प्रवृत्ती दिसत नसल्याचा आरोप ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी केला.
आम्ही चाळीस - चाळीस वर्षे कारखान्यात कष्ट केलेले आहेत. आमच्या हक्काचे ग्रॅच्युइटीची रक्कम कारखाना प्रशासन देत नाही. आमचं व कारखाना प्रशासनाचे किंवा नेतेमंडळी चे कोणतेही वाकडे नाही, आमच्या कष्टाचे पैसे त्यांनी त्वरित द्यावेत. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी देखील आम्हाला घराबाहेर आंघोळ करावी लागली आहे. आमच्या उतार वयात आम्हाला त्या पैशाची फार आवश्यकता आहे. तरी कारखाना प्रशासनाने ग्रॅच्युइटीची रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर द्यावी अशी मागणी रवींद्र फडतरे यांनी यावेळी केली.
No comments