फलटण येथे भारतीय दलित पँथरचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![]() |
| फलटण येथे बोलताना अशोकराव गायकवाड |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : येथील रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या वतीने दलित पँथर चा ३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. भारतीय दलित पॅंथर या संघटनेची स्थापना दि ८ नोव्हेंबर १९८५ रोजी माईसाहेब आंबेडकर व मा.केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे करण्यात आली होती. आत्मनिर्भरता व आत्मसन्मान या दोन मुद्यांवर मंगळवार पेठ व फलटण तालुक्यातील दलित वंचीत उपेक्षित तरुणांच्या सहकार्यातून स्थापना केली गेली. दलित समाजाच्या समस्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा सामना करण्यासाठी तसेच समाजातील अंधश्रध्दा यांचा बिमोड करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून, संघटनेची स्थापना केली होती. 'शिका, संघटित व्हावा व संघर्ष करा' हा महामंत्र डॉ.बाबासाहेबांचा घेवून दलित चळवळीचा पाया फलटणच्या राजकारणात रोवण्याचे काम दलित पँथरच्या माध्यमातून आजतागायत सुरु आहे. असे प्रतिपादन आर.पी.आय. जिल्हासचिव विजय येवले यांनी मांडले.
मा.जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड आपले मनोगत मांडताना म्हणाले 'फलटणची भारतीय दलित पँथर संघटना सातारा जिल्ह्यासाठी आम्हास प्रेरणास्थानी होती. नियोजनबध्द चळवळीचे नियोजन व आंदोलन केले जात होते. दलित चळवळीचा वारसा व मा.आठवले साहेबांच्या पक्षाची धुरा मोठ्या जिकीरीने फलटण येथील भिमसैनिक पुढे सांभाळताना दिसत आहेत. चंद्रकांत अहिवळे, मधुकर काकडे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, लक्ष्मण अहिवळे, राजू मारुडा, विमलताई काकडे व इतर पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून कोणतेही आंदोलन, चळवळ व पक्षाचा कोणताही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडताना दिसतात' असे म्हणाले.
भारतीय दलित पँथर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना अशोकराव गायकवाड यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्या मोठ्या कष्टाने व उमेदीने डॉक्टर, नर्स, आशा सेविका, सफाई कर्मचारी यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांक भेट देणेत आला. तसेच नुतन आर.पी.आय.कार्यकारिणीचा सत्कार मधुकर काकडे, मुन्ना शेख, संजय निकाळजे यांच्या हस्ते करणेत आला.
यावेळी मंगळवार पेठ व इतर सर्व पदाधिकारी, डॉक्टर, नर्स, कर्मचारी, स्पर्धक मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय निकाळजे यांनी केले.आभार-राजू मारुडा यांनी मानले.


No comments