Breaking News

आकाशात चमकण्याचे भाग्य सर्वच मुलींच्या नशिबी नाही

  गंधवार्ता स्पेशल   written by सौ. वैशाली शिंदे 

आंतरराष्ट्रीय मुलगी  दिन विशेष  (गंधवार्ता स्पेशल)

         आज ११ ऑक्टोबर हा दिवस  ‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन’ म्हणून साजरा केला जातो. दहावी, बारावी परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच अव्वल असल्याचे दरवर्षीचे निकाल सांगतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी सर्वच शैक्षणिक शाखांमध्येही मुलींचाच बोलबाला आहे. मिळालेल्या संधीचा त्या पुरेपूर लाभ उठवून पालकांचे स्वप्न साकारत आहेत. हल्ली खेड्यापाड्यांतील मुलीही तालुक्याच्या ठिकाणी एसटीचा प्रवास करून शिक्षणासाठी जाताना दिसतात. अर्थात प्रगतीच्या विस्तीर्ण आकाशात चमकण्याचे भाग्य सर्वच मुलींच्या नशिबी नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. शिक्षणाला पारख्या झालेल्या मुलींचे प्रमाण आजही मोठे आहे. ग्रामीण भागांत गोरगरिबांच्या लेकी शाळेत दिसत असल्या तरी त्यांच्या शिक्षणाकडे वा आरोग्याकडे लक्ष पुरवायला पालकांना वेळ नसतो. इतर मुली शाळेत जातात म्हणून त्यांच्यासोबत आपलीही लेक पाठवायची, एवढेच त्यांना ठाऊक असते. तिने शाळेत गेलेच पाहिजे, शिक्षण घेतलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो असे नाही. त्यामुळेच कधी लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, घरकामासाठी त्यांना घरी ठेवून घेतले जाते. 

        पुरोगामी राज्य म्हणून गणल्या जाणार्‍या महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्येचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मुलीचा गर्भ काढून टाकण्याची अमानुष प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आधुनिक तंत्रांचा गैरवापर त्यासाठी सर्रास होत आहे. बीडमधील डॉ. मुंडे दांपत्याने गर्भातच कोवळ्या कळ्यांचा गळाघोट करून त्यावर पैसे कमावण्याचे सोनोग्राफीचे दुकान थाटले होते. अशा प्रकारांतूनच मुलींंचे लोकसंख्येतील दरहजारी जन्मप्रमाण घटत आहे. 

        मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘लेक वाचवा’ अभियान त्यापैकीच एक! विविध व्यासपीठांवरून स्त्री भू्रणहत्या रोखण्यासाठी समाजप्रबोधन केले जात आहे, ही चांगली बाब असली तरी अशा विचारांचा अंगिकार करण्याकडे अजूनही समाजाचा तेवढा कल दिसून येत नाही. प्रगत राज्यांतील काही जातींमध्ये तर जन्माआधीच मुलीचा गळा घोटला जातो. खाप पंचायतीसारख्या कुप्रथा मुलींच्या मुळावर आल्या आहेत. मुलाच्या विवाहासाठी गरीब कुटुंबांतील, जातीतील मुली विकत घेण्यासारखे वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. मुलींच्या घटत्या संख्येचा प्रश्‍न भयानक स्वरुप धारण करू लागला आहे. यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. २०११ च्या जनगणनेत ते आणखी घटल्याचे दिसून आले आहे. 

     गेल्या २० वर्षांत देशात सव्वा कोटीच्यावर स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचे सांगितले जाते. २०११च्या जनगणनेतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यात १९९१ साली दर हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया असे प्रमाण होते. ते २००१ मध्ये ९१२ झाले. २००९ मध्ये ते ९०९ होते तर २०११ मध्ये हाच आकडा ८८३ वर घसरला. ही आकडेवारी स्त्री-पुरुष समतोल धोक्यात आल्याची निदर्शक आहे. १९९१ मध्ये ० ते ६ वर्षाच्या हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४६ होते. २००१ मध्ये ते ९२७ वर आले. राज्यातील ३८ तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण ११ टक्क्यांनी घटल्याचे आकडे बोलके आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार ० ते ६ वयाच्या मुलींचे प्रमाण शहरी भागात झपाट्याने घटत आहे. आदिवासी व मागासबहुल जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईसारख्या शहरात मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे ९२७ आहे. नाशकात ते ९२० इतके आहे. गर्भजल परीक्षणविरोधी कायदा कठोर असला तरीही सोनोग्राफी सेंटर्सवर मोठ्या प्रमाणात गर्भजल निदान होत असल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

         महिला दिन, मातृत्व दिन दरवर्षी साजरे होतात. ते साजरे होताना किती स्त्रिया मुलीच्या जन्माबाबत आनंद व्यक्त करतात? घराण्यासाठी ‘वंशाचा दिवा हवा’ म्हणून सासूच्या भूमिकेत आग्रह धरणारी आणि सुनेला गर्भपातासाठी प्रवृत्त करणारी स्त्रीच असते. देशात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. देवीच्या रुपाने शक्तीची पूजा केली जात आहे. अनेक वेळा स्त्रियांचा मानसन्मान केला जातो. मात्र हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार, अत्याचार, छळाच्या घटना वाढल्या आहेत. त्या पाहता या समाजाला अशी कोणती कीड लागली आहे, असा प्रश्‍न पडतो. हल्ली स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी होत असल्याची उदाहरणे पाहावयास मिळत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. 

         आजारी आईच्या सेवेसाठी गौरी त्रिवेदी यांनी सनदी अधिकारीपदाची नोकरी सोडली. गुजरातमधून पहिली आयएएस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला होता. आई-वडिलांप्रती मुलींना अधिक माया असते असे म्हटले जाते, याचे हे ठळक उदाहरण होय. मुला-मुलींमधील तुलनात्मक प्रमाण दिवसेंदिवस घसरत आहे, ही चिंतेची बाब आहे. ती लक्षात घेता सुजाण नागरिक या प्रश्‍नाकडे निश्‍चितच गांभीर्याने
पाहतील.  
सौ वैशाली शिंदे 
संस्थापिका अध्यक्षा 
आयडियल इंटरनॅशनल स्कूल.

1 comment: