Deputy Chief Minister Ajit Pawar inspected the heavy rains and flood situation in Baramati
गंधवार्ता वृत्तसेवा (दी. 17 ऑक्टोबर 2020) - बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पहाणी करून स्थानिकांशी संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करा आणि शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही यावेळी पवार यांनी दिल्या.
पुढील काळात पुरस्थिती टाळण्यासाठी नदीचं खोलीकरण करणं, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटवणं तसंच नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणं होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कऱ्हावागज-अंजणगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसंच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामं तातडीनं करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भिगवण रस्त्यावरील अमरदिप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली.
No comments