एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहोचविले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२५ :- आपल्या नाद-मधुर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तीही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकुमत गाजविणाऱ्या ‘एसपीं’नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलीकडे असते हे सिद्ध करत ‘एसपीं’नी आपल्या नाद-मधुर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलीकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दुनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. पण एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दुःखद आहे. ज्येष्ठ गायक एस.पी.सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई, दि. २५: सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ गायक श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम अर्थात एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रध्दांजली अर्पण केली.
श्री.थोरात शोकसंदेशात म्हणतात, एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलेल्या एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशा बहुभाषांमध्ये पार्श्वगायन केले. एका दिवसात सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला. ९० च्या दशकात त्यांना अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणूनही ओळखले जायचे. गायनाबरोबरच अभिनयाची आवड असणाऱ्या एस.पी.बालसुब्रमण्यम यांनी ‘हम से है मुकाबला’ सिनेमात कामही केले होते. एस.पी.बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून आपण त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे श्री.थोरात यांनी सांगितले.
No comments