Breaking News

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी

 

Issued revised instructions of the Election Commission regarding the criminal background of the candidates
            मुंबई - भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2018 व 06 मार्च 2020 रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने आयोगाने दिनांक 11 सप्टेंबर, 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूकीय लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी/उन्नतीसाठी या नैतिक बाबीवर जोर दिला आहे.

सुधारीत सूचनांचे ठळक मुद्दे

 अ.     प्रसिद्धीसाठी सुधारीत वेळापत्रक:-

        सुधारीत दिशानिर्देशानुसार उमेदवारांनी, तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करतील:-

(i) प्रथम प्रसिद्धी:- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये.

(ii) दुसरी प्रसिद्धी:- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या 5 व्या ते 8 व्या दिवसांमध्ये.

(iii) तिसरी प्रसिद्धी:- 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (म्हणजेच मतदान होण्याच्या 2 दिवस अगोदर)

        हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकार चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगात आणण्यास मदत करेल.

ब.         बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय यांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षांसाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील प्रसिद्ध करतील.

        आयोगाने ठरविल्यानुसार,आतापर्यंत प्रसिद्ध कारण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन भागधारकांच्या हितासाठी प्रकाशित केले जात आहे. हे मतदार व इतर भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यात मदत करेल.
        यासंदर्भातील सर्व सूचना,गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशित करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजेत.
या सुधारित सूचना तात्काळ प्रभावाने लागू होतील.
असे राज्य  निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

No comments