हाथरस सामूहिक बलात्कारातील पीडितेचा मृत्यू : पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक व लाजिरवाणी आहे. असं अमानूष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली! - उपमुख्यमंत्री अजित पवार
यूपीच्या हाथरसमध्ये दलित मुलीवर केलेल्या अत्याचार आणि हत्या या अमानुष घटनेचा मी निषेध करतो आणि हे अमानुष कृत्य करणार्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करतो. - खा. रामदास आठवले
भारताच्या एका मुलीवर बलात्कार, खून केला जातो, वस्तुस्थिती दडपली जाते आणि शेवटी अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही तिच्या कुटूंबाकडून काढून घेण्यात आला. हे निंदनीय आणि अन्यायकारक आहे. - खा. राहुल गांधी
बलात्कारासह क्रूर जातीय हिंसाचार सहन केल्या नंतर आज हाथरस येथील आमच्या मुलीने आपले प्राण गमावले. आज ज्या दिवशी आम्ही 14 वर्षापूर्वी घडलेल्या खैरलांजी घटनेची आठवण काढतोय, त्याच दिवशी ही घटना घडणे दुर्दैवी आहे. कायद्याच्या पूर्ण ताकदीसह न्याय त्वरित मिळवा - ॲड. प्रकाश आंबेडकर
हाथरसमध्ये जे घडले ते अमानुष आहे आणि क्रौर्याच्या पलीकडे आहे. आशा आहे की या भयंकर गुन्ह्यातील दोषींना शिक्षा व्हावी. - विराट कोहली
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 30 सप्टेंबर 2020) - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
हाथरस येथील घटनेतील पीडितेवर पोलिस प्रशासनाकडून पीडितेच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता अचानक अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळावर काही पत्रकारांनी कोणाचा अंत्यसंस्कार चालला असल्याचे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांकडून पत्रकाराना, कोणतेच उत्तर मिळत नव्हते. आम्हाला फक्त कायदा व सुव्यवस्थेसाठी नियुक्त केले आहे, काय मॅटर आहे ते आम्हाला माहीत नाही असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते.
यूपीच्या हाथरस जिल्ह्यात चार नराधमांनी राक्षसांनाही लाजवेल असे क्रौर्य दाखवले. तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.
नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. त्याचा उल्लेख अहवालातही आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवड्याभराच्या आता रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे.



No comments