माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 27 सप्टेंबर 2020) - माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून आजारी होती. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय लष्करात असलेल्या जसवंत सिंह यांनी नंतर राजकारणात पाऊल टाकले. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी भाजपचं प्रतिनिधित्व केलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १९९९ ते २००४ दरम्यानच्या कार्यकाळात जसवंत सिंह यांनी संरक्षण, विदेश आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार यशस्वी सांभाळला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात 'जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्द्यांची जगभरात एक छाप सोडली, त्यांच्या निधनानं दुःखी आहे.', असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की , जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.”
No comments