Breaking News

बोगस सैन्य भरती घोटाळ्यातील पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून तपास सी.बी.आय. कडे वर्ग करावा - मनसे

संग्रहीत छायाचित्र 

         फलटण दि. 30 सप्टेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) -   बोगस सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपींना मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास एस .आय .टी. किंवा सी .बी .आय. कडे वर्ग करावा अन्यथा  २ ऑक्टोंबर गांधी जयंती पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर   उपोषणाला बसण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे दिला  आहे.

      भारतीय नौदल लष्कर तसेच अर्धसैनिक दलामध्ये भरतीचे आमिष दाखवून फलटण तालुक्यातील भाडळी येथील आकाश काशिनाथ डांगे, बारामती येथील नितीन जाधव यांनी संगनमताने महाराष्ट्रातील शेकडो युवकांची लष्करात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली आहे.  याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत भिगवण तालुका इंदापूर येथे दिनांक २० जून रोजी गुन्हे दाखल झाले आहेत . गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी भारतीय संरक्षण दलात भरतीचे आमिष दाखवून अनेक युवकांची आर्थिक फसवणूक करून देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे . आकाश डांगे व नितीन जाधव यांच्या विरोधात फलटण शहर व ग्रामीण ठाण्यात अनेक युवकांनी आपल्या आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तक्रार अर्ज केले होते.  सदर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपी बरोबर संगनमत करून या दिलेल्या तक्रार अर्जांची परस्पर विल्हेवाट लावली आहे . फलटण शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे उपनिरीक्षक उस्मान शेख आपल्या कर्तव्यात कसूर करून देशविघातक कृत्य करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळणाऱ्या आकाश डांगे व नितीन जाधव यांना पाठीशी घालून त्यांना मदत केली आहे . तसेच या बाबत संदीप बनकर व उस्मान शेख यांच्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी संशयीताला मदत केल्याचा ठपका ठेवत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तडकाफडकी बदली केली होती , त्याबाबत कोणतीही चौकशी पुर्ण न होता त्यांना पुन्हा फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाणे येथे नेमणुक दिल्याने  सदर सुरू असलेल्या चौकशीत अडथळे येवु शकतात व संबंधीत अधिकारी पुरावे नष्ट करू शकतात.  म्हणून या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांना सदर गुन्ह्यातील सहआरोपी करावे तसेच या गुन्ह्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याने योग्य तपास व्हावा म्हणून या संपूर्ण प्रकरणाचा तपास एस . आय .टी . किंवा सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा म्हणजे या कटामागील खरे चेहरे उघड होतील व महाराष्ट्रातील शेकडो तरुणांना योग्य तो कायदेशीर न्याय मिळेल . अन्यथा दि . २ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे याची आपण गंभीरपणे नोंद घ्यावी असे युवराज शिंदे यांनी गृहमंत्री यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे.

No comments