सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात - ॲड. प्रकाश आंबेडकर

आठ ते दहा दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील असं आश्वासन मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ.याची नोंद सरकारने घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर च्या माध्यमातून दिला आहे.
पंढरपूर दि. 31 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -: राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.अखेर प्रशासनानं त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली. आंबेडकर यांच्यासोबत काही मोजक्या जणांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं आंबेडकर म्हणाले. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं माझ्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.१० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपण त्यांना काळाराम मंदिराची आठवण करून दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. देश पारतंत्र्यात असताना बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिकमधील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला होता. त्यावेळी मंदिराची किल्ली पुजाऱ्याच्या हाती होती. आता मंदिराची किल्ली तुमच्या हाती आहे, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कोणी कोणी घेतलं विठ्ठलाचं दर्शन?
अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, विकी शेंडगे, अमित भुईगळ

No comments