Breaking News

जाधववाडी कोरोना सेंटरवर महिलांची कुचंबना

 

        फलटण दि 31 ऑगस्ट 2020  (ॲड. रोहित अहिवळे) - कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने, शासनाकडून  योग्य ती खबरदारी घेऊन, उपाय योजना केल्या जात आहेत. ठीकठिकाणी खाजगी  रुग्णालयांचे अधिग्रहण करून, त्याचा  कोविड रुग्णांसाठी उपयोग केला जात आहे. तसेच संशयित रुग्णांच्या  जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर  आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर शासनाचा  भर असतानाच,  फलटण येथील  जाधववाडी कोरोना सेंटरची दुरावस्था झाली असल्याचे दिसते. कोरोना केअर सेंटरवर राहणाऱ्या महिला रुग्णांना याचा खरा त्रास आहे. महिलांना आपले प्राथमिक सोपस्कार हे  मनात लज्जा उत्पन्न होत होत  पूर्ण करावे लागत आहेत. या ठिकाणी महिलांची कुचंबना होत आहे.  

         आज  5 महिने झाले तरी देखील जाधववाडीचे कोरोना केअर सेंटर येथे, संशयित रुग्णांना मूलभूत सेवा देखील व्यवस्थित पुरवल्या जात नाहीत. इथे रुग्णांसाठी असणाऱ्या बाथरूमला दरवाजेच नाहीत. त्यामुळे प्रामुख्याने महिलांची मानहानी होत असून, महिलांना आपले प्राथमिक सोपस्कार हे  मनात लज्जा उत्पन्न होत व कोण आले तर नाही, कोण पाहत नाही ना! अशी भीती मनात धरून अंघोळ व स्वच्छता उरकावी लागत आहे. ही महिलांची एक प्रकारे मानहानीच आहे. 
 
        येथे येणारे रुग्ण कमीत कमी 7 ते 14 दिवस येथे राहतात आणि या कालावधीत शरीराची स्वच्छता ही महत्त्वाची आहे . शरीर स्वच्छ केले तरच मनाला स्वच्छता, उत्साह वाटत असतो.  कोणत्याही आजारामध्ये मन ताजेतवाने असेल, शरीर स्वच्छ असेल तर ती व्यक्ती लवकर रिकव्हर  होते. आणि बाथरूमांना जर दरवाजेच नसतील, तर महिला भगिनी स्वच्छता कशा करणार ? एक तर स्वच्छता न करणे किंवा घरातील कोणी व्यक्ती बरोबर असेल तर, त्या व्यक्तीला बाथरूमच्या बाहेर थांबवूनच सर्व सोपस्कार उरकावे लागत आहेत. त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष देऊन, या बाथरूमांना दरवाजे बसवावेत, दरवाजे बसवण्यास जास्त वेळ लागत असेल तर कमीत कमी पडदे टाकून तरी महिलांची सोय करून द्यावी.

No comments