Breaking News

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

 

Gopinath Munde Accident Insurance Scheme should benefit maximum farmers - Dadaji Bhuse
   नागपूर - : शेतात काम करतांना शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता  त्यांच्या कुटुंबियांना  तातडीने मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेने नोंद घेवून कार्यवाही करावी.  गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज वनामती येथील आढावा बैठकीत सांगितले.

        आमदार आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, कृषी सहसंचालक रविंद्र भोसले,  विस्तार प्रशिक्षण संचालक नारायण सिसोदे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक अजय कडू, विभागीय उपसहनिबंधक संजय कदम यावेळी  उपस्थित होते.

        कृषी विभागातील कृषी सहायकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी शासकीय चौकटीच्या पलिकडे जावून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या कालावधीतही कृषी विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण रानभाज्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल कृषीमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

       शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल यानुसार मंडळनिहाय पिकांचे क्लस्टर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात संत्र्यांचे सहा, भिवापुरी मिर्ची, जवस यांचे प्रत्येकी एक डाळी  व कापसाचे चार क्लस्टर तयार करण्यात आले. या पिकांच्या क्लस्टर संदर्भातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले. खरीप पिक कर्जाचे आतापर्यत  65 टक्के वाटप पूर्ण झाले असून पुर्ण हंगामात अंदाजे 80 टक्क्यांपर्यंत वाटप होण्याची माहिती जिल्हा उपनिबंधक श्री.कडू यांनी दिली.

        महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती मंत्रीमहोदयांनी जाणून घेतली. पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे सूचना त्यांनी दिल्या. आतापर्यत जिल्ह्यात 40 हजार 451 शेतकऱ्यांना 347 कोटी कर्ज वाटप झाले आहे. यासोबतच विदर्भात सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. तसेच किडरोग सनियंत्रण माहिती प्रणालीवर (पीडीएमआयएस) माहिती नियमितपणे अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  बोगस सोयाबीन बियाणाबाबतीत राज्यस्तरावर साधारणत: 453 तक्रारीचा निपटारा करण्यात  अशी माहिती त्यांनी दिली.


No comments