Breaking News

फलटणमध्ये कोरोना बरोबर खेळ मांडला !


रविवार पेठ फलटण येथे कंटेनमेंट झोन मध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळताना
फलटण (अ‍ॅड. रोहित अहिवळे) - खेळल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती उत्तम राहते हे जरी खरे असले, तरी मायक्रो कंटेंटमेन्टझोन मध्ये क्रिकेट खेळणे! हे म्हणजे अधिकच होतेय. प्रत्येकाने खेळले पाहिजे, किंवा कसरत केली पाहिजे हे जरी खरे असले तरी, कोरोना संसर्गाच्या या काळात, शासनाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात खेळणे म्हणजे वेडेपणाचे ठरू शकते. हे खेळणे म्हणजे प्रत्यक्षात कोरोना बरोबर खेळ मांडल्यासारखेच आहे. हे क्रिकेट खेळाचे दृश्य आहे फलटण शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या रविवार पेठ येथील रस्त्यावरचे, रविवार पेठ फलटण मध्ये 12 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. या हॉटस्पॉट  ठरलेल्या कोरोनाच्या मैदानात क्रिकेट खेळणारांचे धाडसच म्हणावे लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला प्रशासन कंटेन्मेंट झोन कडे किती दुर्लक्ष करत आहे ते यानिमित्ताने समोर येत आहे.  कोरोना काळात प्रशासनास अधिक कठोर भूमिका घ्यावी  लागणार आहे अन्यथा फलटणमध्ये प्रत्येक ठिकाणी कंटेनमेंट झोन दिसू लागेल. 

फलटण शहर व तालुक्यात  कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे,  प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेतली तर, कोरोना बधितांचा आकडा आपण आटोक्यात आणू शकतो,  एकदा कम्युनिटी स्प्रेड झाल्यानंतर हा आकडा थांबवता येणे शक्य नाही, त्यामुळे फलटण नगर परिषद, तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांनी अधिक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्लक्ष करत असणाऱ्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गल्लोगल्ली असे खेळ मांडले जातील.

त्याचबरोबर नागरिकांनाही दक्षता घ्यावी लागेल, शासनाने आपला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्यानंतर या झोनमध्ये असे खेळणे किंवा वावरणे चुकीचे ठरू शकते, प्रसंगी जीवावर बेतू शकते, तसेच कोरोना संसर्ग वाढवण्यास आपण कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी वेळीच आवर घालून, किमान कंटेनमेंट झोनमध्ये तरी स्वतःच्या घरातच बसावे इतरत्र फिरू नये  व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
फलटण शहरासह तालुक्यात कोरोना  रुग्ण वाढू लागले असून नागरिकांनी वेळीच दक्षता घेतली नाही तर भविष्यात हा आकडा वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे, बाहेर पडले तरी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, तोंडाला मास्क वापरावा,  घरी आल्यानंतर प्रथम हात पाय स्वच्छ धुवावेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे म्हणजे कोरोना संसर्ग आपण थोपवू शकतो. 

2 comments:

  1. बारामती चौकात तर बंद केलेले गेट उघडून दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्त बाहेर येतात व जातात.

    ReplyDelete
    Replies
    1. कुठल्याही कंटेनमेंट झोन मध्ये असे फिरणे चुकीचे आहे. कोरोना संसर्ग वाढवण्यास आपण कारणीभूत ठरू शकतो, किमान कंटेनमेंट झोनमध्ये तरी फिरू नये.

      Delete