टाकळवाडे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने मनरेगांतर्गत केलेले वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आदर्शवत - मनीषा ओव्हाळ
![]() |
| वृक्षारोपण पाहणी करताना सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे व अन्य मान्यवर. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - टाकळवाडे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने मनरेगांतर्गत केलेले वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आदर्शवत असल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देत सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी गावातील शासनमान्य रास्त भाव दुकान, स्मशानभूमी, ग्रामपंचायत दप्तर तपासणी केली.
सातारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ (आयएएस प्रशिक्षणार्थी) यांनी नुकतीच टाकळवाडे, ता. फलटण या गावास अचानक भेट देऊन विविध ठिकाणांची पाहणी केली, ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, ग्रामस्तरीय शिक्षण समिती अध्यक्ष नानासाहेब ईवरे, सरपंच सौ. रेखाताई नानासाहेब ईवरे, उपसरपंच राहुल फुले, ग्रामसेवक संदीप एखंडे, पुरवठा निरीक्षक काकडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळवाडे ग्रामपंचायतीने मनरेगांतर्गत लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देतानाच कडुनिंब, करंज, वड, पिंपळ, रेन ट्री, निलगिरी, आपटा, नांदुर्ग (नांद्रुक), नारळ, शेवगा, चिंच, बोर वगैरे विविध प्रकारची सुमारे एक हजारावर झाडे गायरान क्षेत्रात लावली असून त्याचे उत्तम संगोपन करुन अन्य गावे व ग्रामस्थांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला असल्याबद्दल सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
सरपंच सौ. रेखाताई ईवरे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रभारी तहसीलदार गटविकास अधिकारी व ग्रामस्थांचे स्वागत केले. मनरेगांतर्गत कामाची प्रशंसा करुन दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि अचानक भेट देऊन केलेले मार्गदर्शनाबद्दल अधिकाऱ्यांना धन्यवाद देत या भेटीमुळे आमचा उत्साह दुणावला असून यापुढे ग्रामविकासाची कामे अधिक गतिमान करण्याची ग्वाही सरपंच सौ. रेखाताई ईवरे यांनी यावेळी दिली.
उपसरपंच राहुल फुले यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी माजी सरपंच सौ. रुपाली डांबे, माजी उपसरपंच युवराज मुळीक, विकास सोसायटी व्हा. चेअरमन दीपक फुले, नंदकुमार डांगे, सौ. विमल ईवरे, कल्याण ईवरे, विकास ईवरे, अजित ईवरे, संपत मिड यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने तरुणवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments