Breaking News

शेतकऱ्यांनी सेंद्रिय फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज - सुभाषराव भांबुरे


सेंद्रिय फळबाग लागवड शुभारंभ करताना सुभाषराव भांबुरे व सौ. वसुधा भांबुरे.

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यात फळबागा खालील क्षेत्रात सतत वाढ होत असून  तालुक्याचा इतिहास पाहिला तर  पूर्वी फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळांचे उत्पन्न घेतले जात होते, म्हणूनच फलटणला फलपत्थनपूर असे नाव पडले असावे फलटणची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन फरांदवाडी कृषी क्रांती फार्मर्स ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे व्हा. चेअरमन सुभाषराव भांबुरे यांनी  केले आहे. 

        फरांदवाडी, ता. फलटण येथे सेंद्रिय फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला, पेरु, लिंबू वगैरे विविध प्रकारची देशी फळझाडे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने लावण्यात आली असून त्याला पूर्णतः सेंद्रिय खते घालण्यात येणार असून दर्जेदार फळबाग शहरालगत उभी करुन त्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय फळबाग बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याचे भांबुरे यांनी स्पष्ट केले.

          फलटण तालुक्यामध्ये पारंपारिक पद्धतीने ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते,  ऊसाच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असल्याने शेतीमध्ये वर्षानुवर्षे ऊसाचे पीक घेतल्यामुळे बऱ्याच जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत. या जमिनीमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रतीचे उत्पादन घेता येत नाही, अशा जमिनीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने जमिनीवर प्रक्रिया करुन सेंद्रिय पद्धतीने फळबागाची लागवड करता येऊ शकते. सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवडीसाठी आमच्या कंपनीद्वारे तज्ञ लोकांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी विनामोबदला उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पद्धतीची फळबाग लागवड करावी. सेंद्रिय पद्धतीच्या फळांना बाजार पेठेमध्ये व परदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो हे भांबुरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

No comments