जेल मधून रजेवर आलेल्या कैद्याने एकाचे घर जाळले
फलटण 30 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) - सांगितलेले काम केले नाही याचा राग मनात धरून, कळंबा कोल्हापूर जेल मधून रजेवर असणार्या आरोपीताने काम न एकणाराचे राहते घर जाळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान फलटण शहर पोलिसांनी या कैद्यास अटक केलेली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती नुसार, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यामध्ये ७ वर्षाची शिक्षा झालेला व कळंबा जेल येथून, कोरोना विशेष अभिवचन रजेवर आलेला आरोपी अंकुश लाला चव्हाण याने दारू पिऊन, दि. 27 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास यशवंत बाबू जाधव यांना हनुमंत बोडरे याला बोलावून घेऊन ये, असे काम सांगितले. परंतु यशवंत जाधव हे बोलावण्यास गेले नाहीत. याचा राग मनात धरून चव्हाण याने जाधव यांचे राहते शेडवजा घर पेटवून दिले. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु आगीमध्ये फिर्यादी जाधव यांचे घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य, सॅमसंग कंपनीचा छोटा मोबाईल, रोख रक्कम दोन हजार रुपये, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, रेशनिंग कार्ड इतर कागदपत्रे जळून खाक झाली त्यात अंदाजे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद यशवंत बाबू जाधव वय 73, व्यवसाय शेती, मूळ राहणार ताथवडा ता.फलटण सध्या रा. ठाकुरकी, ता. फलटण यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे करत आहेत.
सदर गुन्हयातील आरोपी अंकुश लाला चव्हाण याला त्याच्या ताथवडे येथील गावातून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी गावांमध्ये दारू पिवून फिरत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे ,पो.काॅ. अच्युत जगताप यांनी आरोपीस गावातील तळ्याजवळ पकडले.
विशेष अभिवचन रजेवर आल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केला आहे. दोन्ही गुन्हे त्याने दारूच्या नशेमध्ये केलेले आहेत. एका गुन्ह्यांमध्ये शिक्षा होऊन सुद्धा त्याच्या वर्तणुकीमध्ये काही एक सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले आहे. तो गेले दोन वर्षांपासून कोल्हापुर मधील कळंबा कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षाबंदी कैद्यांना विशेष रजेवर सोडण्यात आले होते यामध्ये तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला कारागृहांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे फलटण शहर पोलीस स्टेशन कडून कळविण्यात आले आहे.
No comments