Breaking News

अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे गुगल मीट आणि यु ट्यूब च्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यशाळेत डॉ. जयंत नारळीकर यांचे मार्गदर्शन


अभियांत्रिकी महाविद्यालयात उपस्थित श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व नियामक मंडळ सदस्य, सोसायटी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख वगैरे

फलटण दि. 22 : विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील गणिताचे महत्व या विषयावर बोलताना विख्यात गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी या विषयाची व्याप्ती उदाहरणांसह स्पष्ट केली, त्यापेक्षा सहभागी प्राध्यापक व इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
       फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, इंडियन अकॅडमी फॉर इंडस्ट्रियल अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्स, इंडियन मॅथेमॅटिकल कन्सोर्शियम, भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने आयोजित ३ दिवसीय कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. नारळीकर बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ. देवसरकर, डॉ. हेमंत अभ्यंकर, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शिरिषशेठ दोशी, हेमंत रानडे, डॉ. पुरुषोत्तम राजवैद्य, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांच्यासह सुमारे १६०० गणित अभ्यासक यामध्ये सहभागी झाले होते. गुगल मीट आणि यु ट्यूब च्या माध्यमातून हे ३ दिवसीय सत्र सर्वांसाठी उपलब्ध आहे.
   डॉ. सौ. मंगला नारळीकर यांनी कोड्यामधून गणित अभ्यास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, सोप्या पद्धतीने गणित कसे शिकवावे, लहान मुलांमध्ये गणिताची आवड याबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. 
        फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. नारळीकर यांच्यासह सर्व सहभागी मान्यवर आणि अभ्यासकांचे स्वागत केले, या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भोजराज नाईक निंबाळकर यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. प्रा. सौ. धनश्री भोईटे व डॉ. पल्लवी सोमण यांनी सूत्र संचालन व मान्यवरांचा परिचय करुन दिला.




No comments