माझी तुम्हाला ही 'फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग' - हिंगणगाव पोल्ट्री प्रशासनास दादांनी सुनावले
![]() |
हिंगणगाव पोल्ट्री फार्म येथे बोलताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर |
हिंगणगाव ग्रामस्थांचा त्रास बंद झाला पाहिजे - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - हिंगणगाव परिसरात माश्यांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रासले आहेत. लहान मुलांच्या नाका-तोंडात जर माशा जात असतील आणि ते आजारी पडत असतील तर हे मी सहन करणार नाही, तुम्ही कंपनीने जर हा विषय गांभीर्याने घेतला नाही आणि या परिसरातील लोकांना पुन्हा असा त्रास झाला तर माझी तुम्हाला ही फर्स्ट अँड लास्ट वार्निंग असेल, मी गप्प बसणार नाही, भले मला, जेल झाली तरी चालेल परंतु या त्रासातून नागरिकांना मुक्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हिंगणगाव पोल्ट्री अधिकाऱ्यास दिला.
मौजे हिंगणगाव प्रिमियम चिकस् फीडस् प्रा. ली. हिंगणगाव या पोल्ट्री फार्म मुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून, या पोल्ट्री मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली असून, पोल्ट्री फार्म बंद करण्याचे आदेश काढावा अशी मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने दिनांक 29 जून पासून कंपनीच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन पोल्ट्री अधिकार्यांशी चर्चा करताना इशारा दिला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोल्ट्री फार्मचे प्रशासकीय अधिकारी, अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, सुशांतभैय्या निंबाळकर, सिराजभाई शेख, राजेंद्र काकडे, विलासराव झणझणे, सुधिर करळे, अमित रणवरे, अनिकेत कदम, मनोज कांबळे उपस्थित होते.
![]() |
आंदोलन स्थळावर देखील माशांचा उपद्रव दिसत होता |
हिंगणगाव पोल्ट्री परिसरात दुर्गंधी वाढली असून माशांचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे, या माशांचा भरपूर त्रास होत आहे. जेवण करताना किंवा साधे बसले तरी त्यांच्या उपद्रवामुळे जीव नकोसा होऊन जातो. माश्या लहान मुलांच्या नाका-तोंडात जात असल्यामुळे त्यांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो तरी, पोल्ट्री फार्मला टेम्पररी क्लोजर नोटीस देऊन, तेथे पेस्ट कंट्रोल व अन्य उपाययोजना कराव्यात, म्हणजे माशांचा प्रादुर्भाव बंद होईल अशा सूचना उपविभागीयअधिकारी शिवाजीराव जगताप यांना देतानाच गरज असल्यास या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हा पोल्ट्रीचा विषय मार्गी लावणार असल्याचे खा. रणजीतसिंह यांनी यावेळी सांगितले.
पोल्ट्रीचा व्यवसाय बंद व्हावा किंवा पोल्ट्री येथून बंद व्हावी अशी कोणतीही आपली भूमिका नसून फलटण तालुक्यामध्ये असणारे सर्व व्यवसाय योग्य चालले पाहिजेत. परंतु या व्यवसायापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
पोल्ट्रीची योग्य स्वच्छता ठेवावी, कोंबड्यांना रोज टाकण्यात येणारे खाद्य जे जाळीतून खाली पडते, त्याची वरचेवर सफाई करण्यात यावी, त्यामुळेच माशांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोल्ट्री अधिकाऱ्यास सांगितले. सर्व कोंबड्या खाली करून पोल्ट्री ची सफाई करून, निर्जतुकीकरण करावे किंवा पोल्ट्री संदर्भातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे स्वच्छतेबाबत प्रोसेसिंग युनिट बसविण्याच्या सूचना पोल्ट्री प्रशासकीय अधिकाऱ्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या.
No comments