श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२६ च्या मंडप पूजनाचा उत्साहात शुभारंभ!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि युटिलिटी इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या 'श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२६' च्या मंडप पूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हे कृषी प्रदर्शन दिनांक २ ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, जिंती नाका, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी, कृषी उद्योजक, महिला शेतकरी, विद्यार्थी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध घटकांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि नवीन कृषी संकल्पनांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंडप पूजन कार्यक्रमास में. गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्री. सी. डी. पाटिल, में. गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, महाविद्यालयीन समितीचे सदस्य श्री. रणजितभाऊ निंबाळकर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कृषी प्रदर्शनामध्ये बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त शेती पद्धती, शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, सुधारित बी-बियाणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील आधुनिक यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, फळबाग लागवड तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन व तुषार सिंचन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित विविध दालने उभारण्यात येणार आहेत. तसेच नैसर्गिक व जैविक शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, हवामान बदलानुसार शेती व्यवस्थापन, गटशेती, शेतकरी उत्पादक गटांचे उपक्रम, महिला शेतकऱ्यांचे शेतीमधील योगदान आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध कृषिपूरक उद्योग यांनाही या प्रदर्शनात विशेष महत्त्व देण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर करून उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, शेती अधिक शाश्वत व फायदेशीर बनविणे आणि शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन संधींची माहिती उपलब्ध करून देणे, हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष शेती यांची सांगड घालण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या प्रदर्शनामुळे फलटण तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील नव्या संधी, कृषिपूरक व्यवसाय आणि उद्योजकतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या मंडप पूजन कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments