Breaking News

भारतीय संविधान हे सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचे अधिष्ठान – डॉ. प्रभाकर पवार

The Indian Constitution is the foundation of social justice and democratic values ​​– Dr. Prabhakar Pawar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - : येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रोफेसर  (डॉ.) प्रभाकर पवार यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ विभागातील ज्येष्ठ प्रा. नीलम देशमुख या होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रोफेसर (डॉ.) टी. पी. शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. आर. एन. बनकर हे उपस्थित होते.

    आपल्या व्याख्यानात प्रोफेसर (डॉ.) प्रभाकर पवार यांनी भारतीय संविधान हे केवळ देशाच्या राज्यकारभाराचे मार्गदर्शक दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे प्रतिपादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पित भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, सामाजिक न्यायाची संकल्पना, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. संविधानातील अधिकारांबरोबरच नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन करून त्यातील लोकशाही मूल्ये आपल्या आचरणात आणावीत,असे आवाहन त्यांनी केले.प्रा.सौ.नीलम देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संविधान दिनाचे शैक्षणिक आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट केले.

    कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार  घालून अभिवादन करून इयत्ता ११वी च्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. प्रा.मिलिंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. अमोल रणवरे यांनी सूत्रसंचालन केले.

    यावेळी  प्रा.गोडसे, प्रा. गवळी,प्रा.भोसले,प्रा. शिंदे, प्रा.सौ.शिंदे, प्रा.तरटे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा,निबंध व वक्तृत्व स्पर्धाही घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. भारतीय संविधानातील मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून त्यांना जागरूक, जबाबदार आणि संविधाननिष्ठ नागरिक बनविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.शेवटी प्रा. सौ.अनिता कापसे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

No comments