फलटणमध्ये २ ते ६ डिसेंबरदरम्यान ‘कृषी प्रदर्शन २०२६’; शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान व नव्या संधींचा मेळावा!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ : शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कृषी पद्धती, उत्तम बियाणे, सूक्ष्म सिंचन, पशुपालन व दुग्धव्यवसाय यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने फलटणमध्ये ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २ ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या आयोजनातून श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, शेतीशाळा परिसर, जिती नाका, फलटण येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन तंत्रज्ञान, नवीन संधी, शेतकऱ्यांसाठी एक व्यासपीठ’ या संकल्पनेतून आयोजित प्रदर्शनात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्तम बियाणे, सूक्ष्म सिंचन, पशुपालन व दुग्धव्यवसाय तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह शेतीशी संबंधित विविध विषयांची माहिती उपलब्ध होणार आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे, शेतीतील नवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती घेणे आणि शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील बदलत्या संधींची ओळख करून देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रदर्शनामुळे शेतकरी, कृषी क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी व शेतीविषयक ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्यांना एकाच ठिकाणी विविध कृषी तंत्रज्ञान व माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments