धर्मचिंतनाच्या नव्या वाटा उलगडणारा ‘आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन’ ग्रंथ प्रकाशित
पुणे : आधुनिक समाजाच्या जडणघडणीत धर्माचे स्थान महत्त्वाचे असले, तरी धर्माच्या नावाखाली वाढणारी धर्मांधता, हिंसा आणि धार्मिक उन्माद ही चिंतेची बाब आहे. धर्माचे अंतर्गत, पर्यायी धर्मांच्या अभ्यासकांकडून आणि तटस्थपणे अशा तीन दृष्टिकोनांतून चिकित्सक अध्ययन झाले, तर धर्माविषयीचे गैरसमज दूर होऊन समाजातील धर्मांधता कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता डायमंड पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. नवनाथ रासकर(फलटण) व डॉ. सुनील राऊत (पुणे) संपादित ‘आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे आणि मराठी विश्वकोशाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ. मोरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. मोरे पुढे म्हणाले की, वर्तमान सामाजिक परिस्थितीत धर्मविषयक वैचारिक मंथन घडवून आणणाऱ्या अशा ग्रंथांची नितांत आवश्यकता आहे. धर्म अनेकदा हिंसक स्वरूप धारण करतो; मात्र धर्माचे विवेकी आणि चिकित्सक आकलन झाल्यास त्यामागील गैरसमज दूर होऊ शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाने धर्मापुढे नवी आव्हाने उभी केली असली, तरी धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे धर्माचा अभ्यास हा केवळ श्रद्धेच्या पातळीवर न राहता तो विवेक आणि विचारांच्या कसोटीवर होणे आवश्यक आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. राजा दीक्षित म्हणाले की, धर्म ही सामाजिक अपरिहार्यता असून मानवी समाजाच्या आणि इतिहासाच्या जडणघडणीत धर्माचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे धर्म नाकारून चालणार नाही; मात्र धर्मांधता निश्चितच नको. धर्म ही संकल्पना आपल्या परंपरेत नीती, विवेक आणि कर्तव्य अशा व्यापक अर्थाने वापरली जाते. 'रिलिजन' या शब्दापेक्षा 'धर्म' ही संकल्पना अधिक व्यापक आहे. इतिहास घडण्याची प्रक्रिया आणि त्याचे लेखन यामध्ये अनेकदा द्वंद्व आढळते. मध्ययुगात समाजावर धर्माचा प्रभाव अधिक होता; प्रबोधनकाळात त्यामध्ये परिवर्तन घडून आधुनिक युगाचा आरंभ झाला.समाजाची खरी उन्नती साधायची असेल, तर उन्नत धर्मविचारांची निर्मिती होणे आवश्यक आहे. 'मी आधी मानव आहे, नंतर भारतीय आहे आणि त्यानंतर अमुक धर्माचा आहे,'ही मानवतावादी विचारधारा समाजात रुजली पाहिजे. धार्मिक उन्माद आणि हिंसा यांचा धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी संबंध नाही; मात्र दुर्दैवाने धर्म आणि हिंसा यांची सांगड घातली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथाचे संपादक डॉ. सुनील राऊत यांनी प्रास्ताविकातून ग्रंथनिर्मितीमागील भूमिका, प्रयोजन आणि समकालीन काळातील त्याचे महत्त्व विशद केले. मान्यवरांचे स्वागत व परिचय झाल्यानंतर दुसरे संपादक डॉ. नवनाथ रासकर यांनी ग्रंथाची संकल्पना, त्यामागील वैचारिक भूमिका आणि धर्मचिंतनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरीश नवले यांनी अशा स्वरूपाच्या ग्रंथांची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी नव्या पिढीने अशा वैचारिक ग्रंथांचे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. धर्म या संकल्पनेचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी चिकित्सक वाचन महत्त्वाचे आहे. तथाकथित धर्मांची आज खरोखरच किती गरज आहे, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी बाह्य धार्मिक प्रदर्शनापेक्षा माणसाच्या हृदयातील मानवतावादी धर्म अधिक महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ बुद्धिवादी तत्त्वचिंतक डॉ. प्रदीप गोखले यांनी धर्माकडे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. धर्म ही माणसाला स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देणारी संकल्पना आहे. मृत्यू हा जीवनाचा अंतिम शेवट नाही, या मानवी प्रेरणेतून परलोक आणि अमरत्व यांसारख्या कल्पना विकसित झाल्या. मात्र, या संकल्पनांच्या पलीकडे जाण्यासाठी माणसाने निसर्गाशी, इतर माणसांशी आणि स्वतःशी संवाद साधला पाहिजे. कला, संगीत आणि संस्कृतीच्या विविध पैलूंशी एकरूप होण्याचा प्रयत्न केल्यास मानवी जीवन अधिक समृद्ध होऊ शकते, असे विचार त्यांनी मांडले.
या ग्रंथप्रकाशन सोहळ्यास डायमंड पब्लिकेशन्सचे प्रकाशक श्री. दत्तात्रय पाष्टे, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, डॉ. श्रीनिवास हेमाडे, डॉ. विवेक घोटाळे, डॉ. सुभाषचंद्र भेलके, डॉ. शर्मिला विरकर, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा, माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, प्रा. सुधीर पिटके, डॉ. डी. टी. गायकवाड, डॉ. राजेंद्र चिकटे, लेखक व कवी डॉ. अशोक शिंदे, प्रा. सायरा मुलानी, डॉ. सरिता माने, प्रा. ज्योत्स्ना बोराटे, मुधोजी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. आर. वाय. गायकवाड, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. शिवाजीराव रासकर, डॉ. अनिल टिके, ह.भ.प. प्रा. गंगाधर चंदावाड, प्रा. सतीश पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे संचालक अमोल रासकर, डॉ. आकाश जाधव, अॅड. अभिजीत कदम, लेखक गोपाळ सरक, प्रा. अनिकेत चव्हाण यांच्यासह अनेक लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी, संशोधक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धर्माकडे केवळ श्रद्धेच्या चौकटीतून न पाहता विवेक, मानवता आणि चिकित्सक विचारांच्या आधारे पाहण्याची गरज अधोरेखित करणारा हा ग्रंथप्रकाशन सोहळा वैचारिक प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. नेटके सूत्रसंचालन डॉ. सुनील भोईटे यांनी केले, तर डॉ. बाळासाहेब मुळीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments