Breaking News

प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे विविध उपक्रमांनी विद्यार्थी दिवस साजरा; डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षपूर्ण

Pratap Singh High School Satara celebrates Student Day with various activities; 125 years since Dr. Babasaheb Ambedkar entered the school

    सातारा दि ७ - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकास समान पातळीवर आणण्याचे काम केले. तसेच त्यांनी समाज मध्ये असलेली दरी कमी करण्याचे महत्वाचे काम केले असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ प्रिया शिंदे यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने बार्टी आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा, सामाजिक न्याय विभाग सतार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतापसिंह हायस्कूल येथे आयोजित विद्यार्थी दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 
यावेळी जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम  बार्टी चे संचालक बबन जोगदंड, शिक्षणाधिकारी श्री नायकवडी यांच्यासह जिल्हापरिषद सदस्य उपस्थित होते.

    डॉ शिंदे म्हणाल्या की, प्रतापसिंह हायस्कूल येथील ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके असून त्याचे डिजीटायजेशन करून ती जतन करण्यात येतील तसेच शाळेच्या संवर्धनासाठी १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शाळेत अनेक महान लोकांनी शिक्षण घेतले आहे त्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि शाळेसोबतच सातारचे नाव उंचवावे.

    उपाध्यक्ष श्री भोसले म्हणाले, शाळेच्या संवर्धनासाठी शासनाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याच बरोबर प्राथमिक शिक्षण हे महत्वाचे असून शाळा प्रवेश दिन राज्य स्तरावर राबवण्यात यावा.

    शिक्षण सभापती श्रीमती कदम म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश म्हणजे एक क्रांतिकारी घटना होती. एका युगांतर ची सुरुवात होती.

    यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानेश्वर म्हस्के यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समता, बंधुता आणि समानता याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच सवलतीच्या दरात पुस्तक विक्री, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव आणि शाहिर राजेंद्र कडूसकर यांचा पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्रांतीच्या विचारांचा जागर आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने बार्टी, पुणे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या वतीने विद्यार्थी दिन व शाळा प्रवेश दिनानिमित्त शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे  दिवसभर साताऱ्यात शैक्षणिक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

    या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. डी. टी. गायकवाड यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनप्रवास, शिक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न, सामाजिक परिवर्तनाची चळवळ आणि संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

No comments