डॉ. वैशाली शिंदे यांना ‘नारी शक्ती अवॉर्ड’; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘नारी शक्ती अवॉर्ड २०२६’ साठी फलटणच्या डॉ. वैशाली विजय शिंदे यांची निवड झाली आहे. ‘लेगसी ऑफ एक्सलन्स इन लीडरशिप’ या विशेष श्रेणीत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी बंगळुरू येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात डॉ. शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिलांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि समाजातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लेगसी ऑफ एक्सलन्स इन लीडरशिप’ ही पुरस्कार श्रेणी नेतृत्वाच्या माध्यमातून निर्माण केलेला कार्याचा ठसा आणि समाजासाठी दिलेले योगदान यांचा सन्मान करणारी आहे. या श्रेणीत डॉ. शिंदे यांची निवड होणे ही फलटणसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
महिलांनी स्वतःच्या क्षेत्रात यश संपादन करण्याबरोबरच आपल्या कार्यातून इतर महिलांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण करावा, हा या पुरस्कारामागील महत्त्वाचा विचार आहे. डॉ. वैशाली विजय शिंदे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे फलटणसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

No comments