भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीची प्रेरणा – ॲड.डॉ.ए. के. शिंदे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या संदर्भपत्रानुसार भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. ए. के. शिंदे यांनी ‘भगवान बिरसा मुंडा : संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक क्रांती’ या विषयावर मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जीवनप्रवास, ब्रिटिश राजवटीविरुद्धचा संघर्ष, आदिवासी समाजाचे संघटन, उलगुलान आंदोलन, सामाजिक व धार्मिक सुधारणा आणि आदिवासींच्या जल, जंगल व जमीन हक्कांसाठी दिलेले योगदान यांचा सविस्तर आढावा घेतला. अवघ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, एकता आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची जाणीव निर्माण केली. त्यांचे विचार आजही सामाजिक न्याय, सांस्कृतिक अस्मिता आणि आदिवासी हक्कांच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफेसर (डॉ.) प्रभाकर पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) पी. एच. कदम होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना बिरसा मुंडा यांच्या मूलभूत मानवी अधिकाराच्या लढ्याची आजच्या काळातील गरज सांगताना नव्या पिढीला भारतातील अशी आंदोलणे व बिरसा मुंडा सारख्या अनेक क्रांतिकारकांचा इतिहास ज्ञात असण्याची गरज प्रतिपादन केली. यावेळी प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) पी.एच.कदम यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शैला क्षीरसागर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रबंधक श्री. आर. वाय. गायकवाड, ग्रंथापाल प्रा. आनंद पवार यांच्यासह प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments