माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले
दहिवडी (प्रतिनिधी) - रेशनिंगसंबंधीच्या एका कामासाठी ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
नारवणे (ता. माण) येथील मासाळ नावाच्या तरुणाचे रेशनिंगशी संबंधित एक काम प्रलंबित होते. या कामासाठी पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांनी ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचून जाधव यांना पंचांसमक्ष लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर तहसील कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कसून चौकशी सुरू होती. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात एकच, खळबळ उडाली असून चौकशीअंती आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments