Breaking News

श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांचा १८८ वा प्रगट दिन व रथोत्सव सोहळा २० ऑक्टोबरपासून; २३ ऑक्टोबरला नगर प्रदक्षिणा

Shri Sadguru Haribaba Maharaj's 188th manifestation day and chariot festival celebrations from October 20; City circumambulation on October 23

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ : श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज यांच्या १८८ व्या प्रगट दिनानिमित्त आणि रथोत्सव सोहळ्यानिमित्त फलटण येथे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती आणि ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, फलटण यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रथपूजनाने रथोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाची भजन व भारुड सेवा होणार आहे.

    बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता महाभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री हरिचरित्र वाचन आणि श्री. चंदूकाका वादे यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ ते ५ या वेळेत लिलावती महिला भजनी मंडळाची भजनसेवा, तर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प. दशरथ महाराज फडतरे (धामणवाडी) यांचे प्रवचन होईल. रात्री ८ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी भारुडसम्राट ह.भ.प. चंद्रकांत बर्गे महाराज व सहकलाकार यांची भारुड सेवा सादर होणार आहे.

    गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता महाभिषेक होईल. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळांची भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत वीरशैव भजनी मंडळ, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ, फलटण आणि श्री दुर्गा माता महिला भजनी मंडळ, कोळकी यांची भजनसेवा होणार आहे. विशाल भुजंगराव भोईटे यांच्या स्मृतीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या प्रेरणेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प. श्री. अंकुश महाराज ईवरे (पीएसआय), टाकळवाडा यांची प्रवचनसेवा होईल. सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत कॅसेट, चित्रपट व यूट्यूब क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या श्री साई समर्थ भजनी मंडळ, विक्रमनगर, कोल्हापूर यांची भजनसेवा होणार आहे.
    २३ ऑक्टोबरला मुख्य प्रगट दिन सोहळा व नगर प्रदक्षिणा, शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध द्वादशीला श्री सद्गुरू हरिबाबा महाराज यांच्या प्रगट दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. सकाळी ६ वाजता महाभिषेक होईल, तर सकाळी १० वाजता श्रींच्या रथाचे प्रस्थान होणार आहे. मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथप्रस्थानाचा कार्यक्रम होणार आहे.

    सर्व विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात होईल. मंदिरापासून निघणारी ही प्रदक्षिणा मलठणनंतर फलटण शहरातून पुढे जाणार आहे. या मार्गावर उघडा मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद, उपळेकर काका मंदिर, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट आणि बुरुड गल्ली या ठिकाणांचा समावेश आहे.

    नगर प्रदक्षिणेच्या मार्गावरील भाविक व नागरिकांनी श्रींच्या नगर प्रदक्षिणेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाने चार दिवसीय सोहळ्याची सांगता होणार आहे. या कालावधीत महाभिषेक, भजनसेवा, प्रवचन, भारुड आणि नगर प्रदक्षिणा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे फलटणमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

    या सोहळ्यास सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती आणि ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments