Breaking News

श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

Reading Inspiration Day celebrated on the birth anniversary of Shrimant Malojiraje Naik Nimbalkar and Dr. A. P. J. Abdul Kalam

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकातून बोलताना प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे फलटणच्या ऐतिहासिक परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. फलटणच्या इतिहासाला समृद्ध वारसा लाभला असून, या वारशामध्ये नाईक निंबाळकर घराण्याचे योगदान उल्लेखनीय आहे. या घराण्याने आपल्या कर्तृत्वातून फलटणच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला आकार दिला. श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे, हा आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. इतिहासातील अशा व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणे, त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण करणे आणि आपल्या परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रांचे वाचन करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी बोलताना प्रा. पी. एस.तरटे ग्रंथपाल यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या ज्ञानाच्या, जिद्दीच्या आणि कठोर परिश्रमांच्या बळावर देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला ज्ञानाची ओढ, शिस्त, जिज्ञासा आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व लक्षात येते.‘वाचाल तर वाचाल’ ही केवळ म्हण नसून ती जीवनाला दिशा देणारी प्रेरणा आहे. वाचनामुळे आपली विचारशक्ती विकसित होते, भाषेवर प्रभुत्व मिळते आणि आत्मविश्वास वाढतो असे त्यांनी सांगितले.

    प्रा. अभिजीत कदम सहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी उपस्थितांना  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आणि देशाचे राष्ट्रपतीपद भूषविले. त्यांच्या जीवनातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो—ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा, मेहनत करण्याची तयारी आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस असेल, तर यशाचा मार्ग निश्चितच खुला होऊ शकतो. आजच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माहिती सहज उपलब्ध झाली आहे. मात्र, माहिती मिळविणे आणि ज्ञान आत्मसात करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पुस्तकांचे नियमित वाचन केल्याने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करता येतो. म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता शैक्षणिक माहिती, ई-पुस्तके आणि ज्ञानवर्धक साहित्य वाचण्यासाठीही करावा.

   आपण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना  आपल्या क्षेत्रातील नवनवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, फलोत्पादन, कीड व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांचे वाचन केले पाहिजे. पाठ्यपुस्तकांबरोबरच संशोधनपर लेख, कृषीविषयक नियतकालिके आणि शास्त्रज्ञांची चरित्रे वाचल्यास आपल्या ज्ञानात भर पडेल. भविष्यात एक कुशल कृषितज्ज्ञ म्हणून काम करताना या ज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल. दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे वाचनासाठी द्या. वाचलेल्या गोष्टींच्या नोंदी ठेवा, नवीन शब्द शिकून घ्या आणि आपल्या मित्रांशी वाचलेल्या विषयांवर चर्चा करा. महाविद्यालयातील ग्रंथालयाचा नियमित वापर करा. यामुळे अभ्यासाची आवड वाढेल आणि विचार अधिक प्रगल्भ होतील. पुस्तक हे असे मित्र आहे, जे आपल्याला ज्ञान देते, विचार करायला शिकवते आणि जीवनाला योग्य दिशा दाखवते. चला, या वाचन प्रेरणा दिनानिमित्त नियमित वाचनाची सवय लावण्याचा संकल्प सर्व करूया आणि सतत वाचन करत राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

    डॉ.यू. डी. चव्हाण प्राचार्य कृषि महाविद्यालय, फलटण यांनी मार्गदर्शन करताना वाचन हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन आहे. पुस्तकांच्या माध्यमातून आपण अनेक महान व्यक्तींचे विचार जाणून घेऊ शकतो, विविध विषयांचा अभ्यास करू शकतो आणि आपल्या विचारांना व्यापकता देऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही, तर आपली भाषा समृद्ध होते, आकलनशक्ती विकसित होते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. या माध्यमांचे अनेक फायदे असले, तरी त्यांचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. केवळ माहिती मिळविण्यापेक्षा त्या माहितीचे आकलन करून तिचा योग्य उपयोग करणे अधिक महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ वाचनासाठी राखून ठेवावा. महाविद्यालयातील ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग करावा आणि वाचलेल्या विषयांवर चर्चा करण्याची सवय लावावी. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे. महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृती विकसित झाली, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होईल असे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले हिने केले. प्रा. एस.पी. तरटे, ग्रंथपाल व पी.डी.भगत कृषि सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments