Breaking News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करावे : रविंद्र बेडकिहाळ यांची मागणी

All India Marathi Literature Conference should be postponed due to drought: Ravindra Bedkihal's demand

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - २८ ऑक्टोबर २०२६ - महाराष्ट्रात यंदा खरीप हंगामात अल्प पाऊस आणि प्रदीर्घ खंडामुळे अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने राज्यातील ३५८ पैकी तब्बल ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये आणखीन तालुक्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. अशा बिकट परिस्थितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जानेवारी २०२८ मध्ये नियोजित असलेले १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तात्काळ स्थगित करावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी केली आहे. फलटण येथील म.सा.प. कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी म.सा.प. फलटण शाखेचे माजी अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, ज्येष्ठ सदस्य रविंद्र बर्गे, प्रा.रवींद्र कोकरे, शाखा कार्यवाह अमर शेंडे आदींची उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना रवींद्र बेडकीहाळ पुढे म्हणाले की, राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचे निवारण करण्यासाठी आणि शेतकरीवर्गाला पूर्ण दिलासा देण्यासाठी शासनाला एकूण सुमारे ४०,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आगामी २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित असून, या एकाच संमेलनासाठी अंदाजे १८ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या साधारण ५ कोटी रुपयांच्या अनुदानाचाही समावेश आहे. तथापि, राज्यात सद्यस्थितीत असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील हवामानाची स्थिती पाहता जानेवारी २०२८ च्या अखेरीस परिस्थिती आणखीनच भयावह होण्याची दाट शक्यता आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत जनतेचे हाल होत असताना भव्य स्वरूपात नियोजित हे साहित्य संमेलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणेच अत्यंत उचित ठरणारे असल्याने ते स्थगित करावे, अशी आपली स्पष्ट मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. ही महत्त्वाची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्याकडे तातडीने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    दरम्यान, म.सा.प. पुणेच्या विद्यमान तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकारी मंडळ सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याच्या घडामोडीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, या घडामोडीला पूर्ण दुजोरा देत रवींद्र बेडकीहाळ म्हणाले की, म.सा.प.चे हे तीन प्रमुख पदाधिकारी सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचेही पदाधिकारी आहेत. त्यांच्याविरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव आणि संस्थेमध्ये सुरू असलेला उलट-सुलट कारभार याचा सखोल विचार करता, अशा अस्थिर व गोंधळाच्या वातावरणात हे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणे अत्यंत अनुचित ठरेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments