'आमदार' चिन्ह लावून मिरवणाऱ्या भामट्याला शिरवळ पोलिसांचा दणका ; मोटार जप्त!
सातारा दि २१ (प्रतिनिधी )- गाडीवर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ असे चिन्ह (लोगो) लावून उनाडक्या करणाऱ्या एका तोतयाला शिरवळ पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. स्वतः किंवा कुटुंबात कोणीही आमदार नसताना केवळ लोकांवर रुबाब झाडण्यासाठी गाडीवर खोटा लोगो लावून फिरणाऱ्या ३५ वर्षीय युवकावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची मोटार जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील केसुर्डी गावच्या हद्दीत पुणे-सातारा सेवा रस्त्यावर शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे आणि त्यांचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी एका संशयास्पद मोटारीच्या क्र. (एम एच ०९डी जे ६६८८) पुढील व मागील बाजूस हिरव्या रंगाचा वर्तुळाकार लोगो, पांढऱ्या अक्षरांत 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य', अशोक स्तंभ आणि 'आमदार' असे लिहिलेले पोलिसांच्या निदर्शनास आले.
संशय आल्याने पोलिसांनी गाडी चालकास थांबवून चौकशी केली असता, चालक विशाल राजेंद्र यादव (वय ३५, रा. केदारेश्वर नंदनवन अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा) हा मद्यधुंद अवस्थेत आढळला. अधिक चौकशीत तो किंवा त्याच्या घरातील कोणीही आमदार नसल्याचे उघडकीस आले. सर्वसामान्यांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी आणि टोल चुकवण्यासाठी त्याने हा बनाव केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि गाडी जप्त केली. पोलीस अंमलदार अरविंद बाऱ्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार शिवाजी जाधव पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
भामट्यांवर कडक कारवाई करणार: सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ परिसरात बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फळकुट दादा आणि भामट्यांची गय केली जाणार नाही.
महेश इंगळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शिरवळ

No comments