गणेश विसर्जनासाठी फलटण नगरपरिषद सज्ज ; कृत्रिम तलावांसह क्रेन, लाईफगार्ड व अग्निशमन यंत्रणा तैनात
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ : शहरात १४ सप्टेंबरपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी फलटण नगरपरिषदेने विविध उपाययोजना केल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सांस्कृतिक भवन आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्ती दान करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी पिरॅमिड चौक, डी.एड. कॉलेज चौक, गजानन चौक आणि उंब्रेश्वर चौक येथे मूर्ती संकलन वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक क्रेनची व्यवस्था पंढरपूर पूल, बारामती पूल आणि शेती शाळा येथे करण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक विद्युत व्यवस्था, लाईफगार्ड, स्वच्छता व्यवस्था तसेच अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
गणेश विसर्जन मार्ग तसेच विसर्जनस्थळांची स्वच्छता करण्यात आली असून, नागरिकांची व गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या विविध विभागांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
फलटण शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांनी नगरपरिषदेकडील उपलब्ध क्रेनचा वापर करून गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेने केले आहे.

No comments