महसूल सुनावणीतील कारभारावर वकील संघ आक्रमक; सुधारणा न झाल्यास बहिष्काराचा इशारा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४: महसूल विभागातील अपील तसेच बी.एन.डी. प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान वकील व पक्षकारांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत फलटण वकील संघाने आज फलटणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, महसूल आयुक्त, पुणे विभाग तसेच जिल्हाधिकारी, सातारा यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत चालणाऱ्या अपील प्रकरणांमध्ये तसेच बी.एन.डी. प्रकरणांच्या सुनावणीवेळी वकील व पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ व संधी मिळत नसल्याची बाब वकील संघाने निवेदनातून मांडली आहे. वकील वैयक्तिक कारणास्तव सुनावणीस अनुपस्थित असताना काही प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या हिताविरोधात आदेश होतात, तसेच काही प्रकरणे एकतर्फी निकाली काढली जात असल्याचा दावा संघाने केला आहे.
प्रकरणाचा निकाल झाल्यानंतर त्याची माहिती संबंधित पक्षकारांना वेळेत मिळत नसल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही करताना अडचणी निर्माण होतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निकालाची माहिती वेळेवर मिळाल्यास संबंधितांना पुढील अपील अथवा पुनर्विचारासाठी आवश्यक कार्यवाही करता येईल, अशी भूमिका वकील संघाने मांडली आहे.
सुनावणी प्रक्रियेत सुधारणा करून वकील व पक्षकारांना सन्मानपूर्वक आणि सौजन्यपूर्ण वागणूक मिळावी, तसेच सुनावणीपूर्वी आवश्यक सूचना व माहिती संबंधितांना देण्यात यावी, अशी मागणी संघाने केली आहे. या बाबींमध्ये सुधारणा न झाल्यास न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे पक्षकारांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असेही फलटण वकील संघाने स्पष्ट केले आहे.

No comments