फलटणच्या सराईत चोरट्याचा पर्दाफाश ; ९ गुन्ह्यांतून साडे१४ लाखांचा ऐवज जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० : सातारा जिल्ह्यातील घरफोडी, जबरी चोरी आणि दुचाकी चोरीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. चाँद उर्फ सुरज जालिंदर पवार (रा. काळज, ता. फलटण) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून तब्बल नऊ गुन्ह्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याच्याकडून ९ तोळे ६ ग्रॅम ८४० मिली सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि हत्यार असा सुमारे १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत करण्यात आले.
दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार चाँद उर्फ सुरज पवार हा साथीदारांसह मानेवाडी परिसरातील शेतामध्ये लपून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी काळज-मानेवाडी परिसरात सापळा रचला.
पोलिसांची चाहूल लागताच पळण्याचा प्रयत्न
१८ जून रोजी संशयिताचा शोध घेत असताना पोलिसांची चाहूल लागताच पवारने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी कसून तपास आणि चौकशी केली असता पवारने सातारा जिल्ह्यासह बारामती परिसरात विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. त्याने केलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दोन जबरी चोरी, पाच घरफोड्या, एक चोरी आणि एका मोटारसायकल चोरीचा तपास लागला.
सोन्याचा मोठा ऐवज पोलिसांच्या हाती
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन ९ तोळे ६ ग्रॅम ८४० मिली असून त्याची अंदाजे किंमत १४ लाख रुपये आहे. गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.
शिरवळ, वडूज, फलटण ग्रामीण, खंडाळा, लोणंद आणि बारामती शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा या कारवाईमुळे तपास लागला आहे. चोरीचा माल खरेदी करणाऱ्या काही सोनारांचाही तपासात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले.

No comments