Breaking News

आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated with enthusiasm at Ideal International School and Junior College, Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बिरदेवनगर, फलटण येथे राष्ट्रभक्ती, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात साजरा करण्यात आला. तिरंग्याच्या रंगांनी सजलेला शाळा परिसर, देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमणारे वातावरण, ढोल-ताशांचा निनाद आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रात्यक्षिकांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याला विशेष रंगत आली.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाचे (ITBP) जवान महेश निंबाळकर यांच्यासह शाळेच्या संस्थापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे, डायरेक्टर शिवराज भोईटे सर , मयूर भोईटे सर , मंदार पाटसकर सर आणि श्रद्धा शहा मॅडम यांचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोफिया तांबोळी मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत व यथोचित सत्कार केला. इयत्ता आठवीतील विद्यार्थी विश्वजीत लाड याने आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

    यानंतर प्रमुख पाहुणे महेश निंबाळकर  यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना उपस्थितांनी राष्ट्रगीत, झेंडागीत, वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीत एकसुरात सादर केले. त्यानंतर झालेल्या ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारून गेला.

    ध्वजारोहणानंतर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या लयबद्ध तालावर अत्यंत शिस्तबद्ध व देखणे मार्च पास्ट सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अचूक पावले, आत्मविश्वासपूर्ण हालचाली आणि शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.

    यावेळी शाळेच्या पालक ॲड. रेश्मा पठाण यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, देशसेवा आणि जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले.

    स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ​विविध देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

    इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगी पॉम-पॉमच्या साहाय्याने ‘जय हो’ या गीतावर उत्साहपूर्ण नृत्य सादर केले.

    लक्ष्मीनगर शाखेतील सीनियर केजी व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आकर्षक ड्रिल एक्सरसाइज सादर केली, तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्सच्या साहाय्याने लयबद्ध व अचूक कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.

    लक्ष्मीनगर शाखेतील ज्युनिअर केजीच्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेल्या निरागस व मनमोहक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

    कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले साहसी मानवी मनोरे (पिरॅमिड). शारीरिक संतुलन, चपळाई, धाडस आणि संघभावनेचे अप्रतिम दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी विविध कसरती व भव्य पिरॅमिड्स साकारले. या चित्तथरारक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

    देशभक्तीपर नृत्यांचे प्रभावी दिग्दर्शन कोरिओग्राफर प्रशांत भोसले सर यांनी केले. संचलन, डंबेल्स कवायत व मानवी मनोऱ्यांचे प्रशिक्षण शुभदा झणझणे मॅडम  यांनी दिले. तर सारिका यादव मॅडम यांनी संगीत चमूच्या (क्वायर ग्रुप) माध्यमातून राष्ट्रगीत, झेंडागीत, वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताचे सुरेल आणि प्रभावी सादरीकरण घडवून आणले.

    विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच राष्ट्रनिष्ठा, शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने शाळेच्या संस्थापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या संकल्पनेतून या भव्य स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे कार्यक्रमाला शिस्तबद्धता आणि भव्यतेची जोड मिळाली.

    त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सेक्रेटरी निखिल कुदळे सर, चैतन्य शिंदे सर आणि प्रवीण पवार सर यांनी कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन व चोख व्यवस्थापन केले.

    कार्यक्रमाचे प्रभावी व बहारदार सूत्रसंचालन सेंटर हेड सुचिता जाधव मॅडम तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित विद्यार्थी व पालकांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

    या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रप्रेम, शिस्त, साहस, संगीत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अनोखा संगम घडविणारा हा स्वातंत्र्य दिन सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील अशा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments