अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास ; फलटण न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ जुलै २०२६ : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला फलटण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारा हा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल मानला जात आहे.
या प्रकरणातील आरोपी दशरथ बबन बनकर (वय ३८, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याने सन २०१८ मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७६, ५०६ तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.खटल्यादरम्यान एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी सादर केलेले पुरावे तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचे दाखले न्यायालयाने ग्राह्य धरले.
या प्रकरणातील यशस्वी तपास आणि न्यायालयीन कामकाज पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, तत्कालीन तपास अधिकारी आर. आर. भोळ तसेच न्यायालयीन पथकाने केले.
हा निकाल अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा देत समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारा आणि पीडितांना न्याय देणारा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिला जात आहे.

No comments