यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये दहावी बोर्ड पुनर्परीक्षेची तयारी पूर्ण ; विद्यार्थ्यांना एक तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१५ - : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथील केंद्र क्रमांक १००२ वर इयत्ता दहावीची बोर्ड पुनर्परीक्षा १६ जून ते २९ जून २०२६ या कालावधीत होणार असून परीक्षेसाठी आवश्यक बैठक व्यवस्था व सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
केंद्र संचालक तथा उपप्राचार्य पी. डी. घनवट यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून परीक्षेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पुनर्परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावरहित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र क्रमांक १००२ वर F000506 ते F000670 या बैठक क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून सर्व परीक्षार्थींनी आपला बैठक क्रमांक तपासून परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यासाठी केंद्र संचालक पी. डी. घनवट, उपकेंद्र संचालक प्रा. जे. ए. नाळे तसेच प्रा. पी. व्ही. साळुंखे यांनी नियोजन केले आहे.
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने दहावी बोर्ड पुनर्परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments