सासकल येथे कृषी विभागाची हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण मोहीम; प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून जनजागृती
फलटण, (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ जून २०२६ : खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत सासकल (ता. फलटण, जि. सातारा) येथे हुमणी कीड भुंगेरे नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेत उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करत प्रकाश (लाईट) सापळ्यांचा वापर करून भुंगेरे नियंत्रणाचा प्रात्यक्षिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे आणि उपकृषी अधिकारी अजित सोनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सासकल येथील शेतकरी शिवाजी बुवासो झांजुर्णे यांच्या शेतात प्रकाश सापळा उभारून हुमणी कीड भुंगेरे नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जून-जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत बाभूळ, कडुनिंब व बोराच्या झाडांवर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमा होत असल्याची माहिती दिली. या भुंगेरांना झाडांच्या फांद्या हलवून खाली पाडावे व रॉकेलमिश्रित पाण्यात गोळा करून नष्ट करावे. तसेच शेताजवळ प्रकाश सापळे लावल्यास भुंगेरे आकर्षित होऊन त्यांचे प्रभावी नियंत्रण करता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
हुमणीच्या प्रौढ भुंगेरांचे नियंत्रण केल्यास त्यांची अंडी घालण्याची प्रक्रिया कमी होते, परिणामी अळींची संख्या घटते आणि पिकांचे होणारे नुकसान टाळता येते. यामुळे उत्पादन वाढीस मदत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवारत्न सचिन जाधव यांनी सासकल गावातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रकाश सापळ्यांचा वापर सुरू केल्याची माहिती दिली. कृषी विभागाच्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

No comments