फलटणमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अधिक सक्षम करण्यावर चर्चा ; बालहृदय शस्त्रक्रिया, जयपूर फूट शिबिरे व डायलिसिस सुविधा वाढविण्यावर भर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१५ - : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची सरोज व्हिला, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान सातारा जिल्हा आणि फलटण तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य अधिक व्यापक व प्रभावीपणे कसे राबवता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांसाठी मदत, जयपूर फूट शिबिरांचे आयोजन तसेच गरजू रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.याशिवाय, फलटण आरोग्य मंडळ संचालित लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आठ डायलिसिस मशीनची संख्या वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीप्रसंगी हवेली पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती श्री. युवराज काकडे यांचीही उपस्थिती होती. श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांनी श्री. मंगेश चिवटे आणि श्री. युवराज काकडे यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य हेही उपस्थित होते. आरोग्यविषयक सेवा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments