गिरवी नाका परिसरात नगर परिषदेची रात्रीची कारवाई ; बंद हातगाड्या, बोर्ड व दुकानांची अतिक्रमणे हटवली
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ जून २०२६ : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत फलटण नगर परिषदेने शनिवारी रात्री गिरवी नाका परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत बंद हातगाड्या, अनधिकृत बोर्ड तसेच दुकानांसमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
नगर परिषदेच्या पथकाने जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्यावरील अडथळे दूर करत वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
या कारवाईमुळे गिरवी नाका परिसरातील वाहतुकीला दिलासा मिळाला असून अतिक्रमणमुक्त शहराच्या दिशेने नगर परिषदेने आणखी एक पाऊल टाकल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
कारवाईमुळे बाधित झालेल्या हातगाडीधारक व अतिक्रमणग्रस्तांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली. तसेच शहरातील इतर भागांमध्येही अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारवाईबाबत सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "नगरपालिका अतिक्रमण हटवत आहे, ही चांगली बाब आहे. मात्र कारवाईदरम्यान हातगाड्या, फलक किंवा इतर साहित्याचे नुकसान होऊ नये याची प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या आर्थिक मंदीच्या काळात हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी साहित्याचे नुकसान म्हणजे मोठा आर्थिक फटका ठरू शकतो. त्यामुळे अतिक्रमण हटविताना मानवी दृष्टिकोन ठेवून त्यांना पूर्वकल्पना देऊन कारवाई करावी."
.jpg)
No comments